भुसावळ (प्रतिनिधी) –
महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा नुपूर महोत्सव 2026 यंदा रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता भुसावळ शहरातील डॉक्टर बी. व्ही. खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी, स्वामी समर्थ केंद्राजवळ संपन्न होणार आहे. नुपूर कथक डान्स अकॅडमीच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून यंदा हा 28 वा महोत्सव आहे.

या महोत्सवामध्ये नुपूर कथक डान्स अकॅडमीचे विद्यार्थी कथक नृत्य सादर करणार असून पाहुणे कलाकार म्हणून आंध्र प्रदेश येथील राष्ट्रीय ख्यातीप्राप्त कुचीपुडी नृत्यकलावंत श्री. रामा कौंडिल्य यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. यावर्षी या महोत्सवात एकूण 40 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
नुपूर महोत्सवाच्या आतापर्यंतच्या प्रवासात कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कथकली व यक्षगान अशा विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण झाले आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांसह पश्चिम बंगाल, त्रिपुरा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व ओडिशा येथील नामवंत कलावंतांनी उपस्थिती लावली आहे.
या कार्यक्रमास झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे विशेष सहकार्य लाभत असून कार्यक्रम सर्व रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला आहे. भुसावळ व परिसरातील शास्त्रीय नृत्यप्रेमींनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नृत्य श्री पुरस्कार जाहीर
नुपूर महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या नामवंत कलावंतास नृत्य श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा नृत्य श्री पुरस्कार आंध्र प्रदेश येथील कुचीपुडी नृत्यकलावंत श्री. रामा कौंडिल्य यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व मानपत्र असे आहे.

श्री रामा कौंडिल्य, आंध्र प्रदेश.


