भुसावळ (प्रतिनिधी) –

केंद्र सरकारचा २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा असून महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवणारा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल जावळे यांनी दिली.
आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि मानवी विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी १२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हायस्पीड कॉरिडॉर, राष्ट्रीय जलमार्ग आणि ग्रीन मोबिलिटी प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. याचा थेट लाभ युवकांना मिळेल, असे आ. जावळे यांनी सांगितले.
कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा शक्ती देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरण हे या अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून लखपती दीदी योजना, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिला उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य तसेच मुलींच्या शिक्षण व आरोग्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे महिलांचा आर्थिक व सामाजिक सहभाग वाढेल, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेशन अंतर्गत सुमारे ९८ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, या निधीतून रस्ते, सिंचन, कौशल्य विकास, उद्योग आणि शहरी पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारी नसून महिला व युवा शक्तीच्या जोरावर विकसित भारत घडवण्याचा दृढ संकल्प आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले.



