शेगाव, (प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने मूकनायक पत्रकार वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे, लॉर्ड बुद्ध टीव्हीचे संचालक सचिन मून, ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर, प्रख्यात वकील राजेश झाल्टे, राष्ट्रीय संघटक दिनेश इखारे, राज्य संघटक पदमा मोहड, राज्य सदस्य विनोद सोनवणे, किरण उपाध्ये आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी प्रस्ताविक सादर केले. यावेळी ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. काही सत्ताधारी शक्तींना खुश करण्यासाठी पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर देशाचे नुकसान अटळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी संदीप बडगे व रजनी भारसके यांनी देशभक्तीपर व समाजप्रबोधनात्मक गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले—
आमदार राजकुमार बडोले (माजी सामाजिक न्यायमंत्री) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार
सनदभाई पटेल – उत्कृष्ट उद्योगपती रत्न
आमदार डॉ. संजय कुडे (माजी कामगार मंत्री) – उत्कृष्ट विकास रत्न
अनिल मनोहर उंबरकर – उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
भूपेंद्र गणवीर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
मोहित देवानंद दामोदर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा समाजभूषण २०२५
महेश बनसोडे – उत्कृष्ट प्रबोधनात्मक चित्रपट निर्मिती पुरस्कार
संदीप प्रल्हाद बडगे – समाजप्रबोधनात्मक उत्कृष्ट गायक पुरस्कार
सचिन मून – बहुजन समाज जनजागृती रत्न
अतिशभाई द्वारका खराटे – समाजभूषण पुरस्कार
तुषार वाघुळदे – बेस्ट अँकरिंग पुरस्कार
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे आभार राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी मानले.
नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने सर्व सन्मानित व्यक्तींना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


