अस्पृश्यांना नव्याने सैन्यात भरती करवून देणारे – सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर)

जळगाव –
३१ डिसेंबर १६०० रोजी भारतात आलेल्या इस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला केवळ व्यापारासाठी पाय रोवले. साधारण १७४० नंतर कंपनीने स्वतःच्या संरक्षणासाठी तसेच इतर कामांसाठी सैन्य भरती सुरू केली. १७५० पासून मोठ्या प्रमाणावर सैन्य उभारून कंपनी थेट युद्धात उतरली. १८२३ पर्यंत कंपनीच्या सैन्यसंख्येने लाखाचा टप्पा ओलांडला. उत्तम प्रशिक्षणामुळे हे सैन्य भारताच्या विविध भागांत कंपनीचे साम्राज्य विस्तारण्यात यशस्वी ठरले.

सैन्यभरती करताना कंपनीने जातीय बंधने पाळली नाहीत. त्यामुळे अस्पृश्य समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी मिळाली. हा समाज काटक, लढाऊ, निर्भिड व मृत्यूला न घाबरणारा असल्याने कंपनीने त्यांना प्राधान्य देऊन सैन्यात भरती केले. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या; काही तुकड्यांचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. अस्पृश्य सैनिकांच्या शौर्यामुळे कंपनीला अनेक युद्धांत यश मिळाले. मोगल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर कंपनीसमोर फारसा शत्रू उरलेला नव्हता.

सैन्यात भरतीमुळे अस्पृश्य समाजाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावला. राहणीमान, खानपान आणि इतर समाजांशी होणारी उठबस यांत लक्षणीय बदल झाला. ही प्रगती काही सवर्ण समाजघटकांना खटकू लागली. परिणामी, अस्पृश्यांना सैन्यात भरती करू नये यासाठी कंपनीवर दबाव वाढू लागला. सवर्ण समाज कंपनीस कसा अधिक उपयुक्त ठरेल, याची सविस्तर मांडणी तत्कालीन मुख्य सेनापती कीचर यांच्यासमोर करण्यात आली.

१८५७ मध्ये कंपनीविरुद्ध मोठे बंड झाले. त्यात कंपनीला विजय मिळाला असला तरी १८५८ मध्ये कंपनी सरकार बरखास्त होऊन थेट ब्रिटिश सरकारची राजवट सुरू झाली. ब्रिटिश सरकारवरही अस्पृश्यांची सैन्यभरती रद्द करण्यासाठी दबाव वाढत गेला. सवर्ण समाजाला खुश ठेवणे व आर्थिक नफा वाढवणे या हेतूने सन १८९१ मध्ये सर्व अस्पृश्य सैनिकांना सेवेतून कमी करण्यात आले आणि पुढे अस्पृश्य समाजाची सैन्यात भरती करू नये, असा लेखी आदेश काढण्यात आला.

सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर) हे १८६६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. सैन्यात असताना त्यांनी सैनिकी शाळेतून इंग्रजी माध्यमातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्व व गणितातील आवड लक्षात घेऊन त्यांची सैनिकी प्रशिक्षण शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे सरकारने त्यांच्यावर शिक्षणविषयक विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. १८८० मध्ये ते मुख्याध्यापक झाले आणि पुढे “सुभेदार” म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८९१ च्या आदेशामुळे सुभेदार रामजी सकपाळ अत्यंत व्यथित झाले. या निर्णयाविरुद्ध अस्पृश्य समाजात असंतोष पसरला. रामजी बाबांनी आपल्या काही सहकाऱ्यांशी चर्चा करून या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाचे नेते गोपाळ बाबा वलंगकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. काही अस्पृश्य सैनिकांची बैठक घेऊन त्यांची बाजू समजावून सांगितली. सर्वांची सहमती मिळाल्यानंतर एक निवेदन तयार करून सैनिकांच्या सह्या घेतल्या व ते निवेदन गोपाळ बाबा वलंगकर यांच्यामार्फत मुख्य सेनापतींकडे पाठवण्यात आले.

सरकारकडून दाद मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर रामजी बाबांनी पुन्हा गोपाळ बाबांची भेट घेतली. त्यानंतर रीतसर वकिलामार्फत नोटीस तयार करून, निवेदन व आवश्यक माहिती रजिस्टर पोस्टाने मुख्य सेनापतींकडे पाठवण्यात आली आणि त्याची पोचही घेतली गेली. १८९१ पासून रामजी बाबा व गोपाळ बाबा यांनी अस्पृश्य समाजाच्या सैन्यभरतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. रामजी बाबा वेळोवेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू ठामपणे मांडत राहिले.

या संघर्षाचा परिणाम अखेर १८९५ मध्ये दिसून आला. १८९१ मध्ये बंद करण्यात आलेली अस्पृश्य समाजाची सैन्यभरती रद्द करून ब्रिटिश सरकारने नवा आदेश जारी केला. १८९५ पासून पुन्हा अस्पृश्य समाजातील लोकांना सैन्यात भरती करण्यास सुरुवात झाली. या सैनिकांनी पुढे महायुद्धासारख्या कठीण काळातही ब्रिटिश सैन्याला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

ब्रिटिश सरकारविरुद्ध न्यायासाठी यशस्वी लढा देणारे सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर) यांचा आज, २ फेब्रुवारी, स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्या महान समाजसुधारक व धाडसी योद्ध्यास त्रिवार अभिवादन.

लेखक : जयसिंग वाघ (जळगाव)