भुसावळ (प्रतिनिधी प्रतिनिधी )- येथील रेल्वे विभागाच्या झेडटीएस (ZTS) प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणादरम्यान झालेल्या विषबाधेच्या घटनेत उपचार घेत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश बबनराव नागवे (वय ३२, रा. शिव सोसायटी प्लॉट, पनवेल, नवी मुंबई) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते भुसावळ येथे रेल्वे विभागाच्या प्रशिक्षणासाठी आले होते. प्रशिक्षणादरम्यान २ जानेवारी रोजी सुमारे १५० कर्मचाऱ्यांना अचानक विषबाधा झाल्याने उलट्यांचा आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला होता.
या घटनेनंतर नागवे यांच्यासह बाधित कर्मचाऱ्यांवर भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याने नागवे घरी परतले होते. मात्र काही दिवसांनी त्यांचा उलट्यांचा त्रास पुन्हा वाढल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १५ जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


