जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला येथील बारेला वस्तीवर दि. २६ जानेवारी रोजी देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ जिल्हा महिला समितीच्या वतीने नारी शक्ती दिन व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वस्तीवरील महिलांनी राणी माँ गाईदिन्ल्यु यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राणी माँ यांच्या कार्याची तसेच संघटनेच्या कार्याची माहिती जिल्हा महिला सहप्रमुख ॲड. चित्रा आचार्य यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सहकोषाध्यक्षा ॲड. जयश्री देशमुख यांच्या गीताने झाली.
यावेळी वस्तीवरील महिलांना हळदीकुंकू, साडी व वाण देण्यात आले. किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच व्हॉईस ऑफ मीडिया कडून मुलांना पतंग व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान वस्तीवरील विविध समस्या जाणून घेण्यात आल्या.
जनजाती बांधवांनी त्यांच्या बोलीभाषेतील गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुलांसाठी प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना खेळणी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी, जिल्हा महिला सहप्रमुख ॲड. चित्रा आचार्य, जिल्हा सहकोषाध्यक्षा ॲड. जयश्री देशमुख, तालुका महिला प्रमुख व पत्रकार उज्वला बागुल, पूर्णकालीन कार्यकर्ता वीरसिंग वसावे उपस्थित होते. वस्तीवरील जाहीरीया बारेला यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




