भुसावळ शहरातील अवैध धंद्यांविरोधात शहर बचाव महिला दक्षता समिती आक्रमक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; 26 जानेवारीला प्रशासनाकडे तक्रार

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहरात वाढत असलेल्या अवैध धंदे, गुन्हेगारी व व्यसनाधीनतेविरोधात भुसावळ शहर बचाव महिला दक्षता समिती आक्रमक झाली असून 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

शहरात सट्टा, पत्ता, मटका, अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू, गांजा, चरस, अफू, बेकायदेशीर सावकारी, चोरी, दरोडे, सोनसाखळी चोरी, वाळू माफिया तसेच शाळकरी मुली व महिलांची छेडछाड यासारख्या गंभीर प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. कायदा व प्रशासनाचा कुठलाही धाक न बाळगता हे अवैध धंदे निर्भयपणे सुरू असल्याने शहरातील महिलांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

शहर बचाव महिला दक्षता समिती समितीच्या सदस्यांनी नमूद केले की, अनेक महिलांनी आपल्या पती, मुलगे व भावांना सट्टा-मटका व दारूसारख्या व्यसनांमुळे गमावले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाकडून अभय मिळत असल्यामुळे हे अवैध व्यवसाय गल्ली-बोळात जोमाने सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच ऑनलाइन मोबाईल माध्यमातून सुरू असलेले मटका-सट्ट्याचे व्यवहार हे सायबर गुन्हे असून त्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवले जात असून त्यांच्या हातात धारदार शस्त्रे व बंदुका दिल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरात सर्वत्र अवैध धंदे सुरू असल्याने गुन्हेगारांना बळ मिळत असून ते खुलेआम शस्त्र घेऊन फिरत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुसावळ शहर भयमुक्त, निर्भय व व्यसनमुक्त ठेवण्यासाठी कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी ठाम मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. निवेदनावर शहर बचाव महिला दक्षता समिती अध्यक्ष सुभद्रा गणपत गुंजाळ , उपाध्यक्षनगरसेविका शेख दिलनवाज इकबाल
सचिव कर सुनिता कृष्णधन
कायदेशिर सल्लागार नंदिनी अनिल चौधरी , शेख नसीम बी शेख नदीम
शबाना बी सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आलमाबानो इब्राहिम कुरेशी , शिवानी दुर्गेश ठाकुर , सविता आनंद सपकाळे , आरती अनिल काठोके आदिच्या सही आहेत

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय दंडाधिकारी व पोलीस अधिकारी भुसावळ, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच शहर व बाजारपेठ पोलीस स्टेशनला पाठवण्यात आल्या आहेत.