जळगाव–भुसावळात अवकाळी पावसाची अचानक हजेरी; शेतकरी व नागरिकांची धावपळ :

जळगाव – भुसावळ (प्रतिनिधी) –

जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात आज दि. २७ रोजी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जळगाव शहरात, तर सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला धाव घेतली, तर काही नागरिक पावसातच अडकून पडले. पावसामुळे काही ठिकाणी वाहनांची गती मंदावली असून बाजारपेठेतही शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. विशेषतः हातमजुरीवर काम करणारे कामगार, फेरीवाले तसेच छोटे व्यावसायिक यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापणीला आलेली पिके, शेतात वाळत घातलेला कांदा व धान्य झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. काही भागांत शेतमाल भिजल्याने नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या लग्नसराईवरही या अवकाळी पावसाचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी मंडप, सजावट साहित्य तसेच जेवणाची व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी लग्नघरांमध्ये घाईगडबड सुरू होती. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाकडून पुढील काही तास ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान लवकर स्थिर व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत.