यावल – वढोदे (ता. यावल) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वढोदे गावाचे सरपंच श्री. संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप रामदास सोनवणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली दिनेश पाटील, उपशिक्षक श्री. सचिन महादेव धालपे, सौ. प्रमिला सचिन धालपे, श्री. किरण सोनवणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध व निर्जंतुक पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने दहिगाव येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले माझी पत्रकार तथा मयंक सेल्स अँड सर्व्हिसेसचे संचालक श्री. गणेश मोतीलाल चौधरी यांच्या वतीने, स्वर्गीय मोतीलाल लोटू चौधरी यांच्या स्मरणार्थ शाळेस पाणी फिल्टर भेट देण्यात आला. या पाणी फिल्टरचे उद्घाटन त्यांचे मोठे बंधू श्री. सुनील मोतीलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या फिल्टरची देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली दिनेश पाटील यांनी त्यांच्या स्वर्गीय सासूबाई कै. सौ. हिरकणबाई हिम्मतराव पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेस मोठे कपाट भेट दिले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल सरपंच श्री. संदीप सोनवणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज प्रात्यक्षिक तसेच सामूहिक कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक श्री. सचिन धालपे यांनी केले.



