भुसावळातील दोन विद्यार्थ्यांची 28 जानेवारीच्या पीएम रॅलीसाठी निवड

भुसावळ : येथील पु. ओं. नाहाटा महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची गणराज्य दिनानंतर दिल्लीत होणाऱ्या 28 जानेवारीच्या पंतप्रधान रॅली (परेड) साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भुसावळच्या शैक्षणिक व एनसीसी क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या सैन्यदलांची ताकद आणि शिस्तीचे दर्शन घडते. त्यानंतर 28 जानेवारी रोजी पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात येते. या रॅलीत देशभरातील निवडक एनसीसी कॅडेट्स सहभागी होतात.

नाहाटा महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस विलास वाघोडे हा एनसीसी महाराष्ट्र 18 बटालियनचा ज्युनिअर अंडर ऑफिसर असून त्याची 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे. परेडमध्ये त्याचे स्थान फ्रंट लाईनमध्ये दुसरा डावीकडील मार्कर असेल.

तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा गोपालराव पवार ही एनसीसी महाराष्ट्र बटालियनची ज्युनिअर अंडर ऑफिसर असून ती 28 जानेवारीच्या पीएम रॅलीत सहभागी होणार आहे. तिचे पथकातील स्थान महाराष्ट्र कॉन्टिजंटमध्ये फ्रंट लाईन कमांड असेल.

हे दोन्ही विद्यार्थी एनसीसीच्या माध्यमातून वायुसेना व नौसेनेच्या संचलन पथकासोबत परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या या यशामुळे भुसावळच्या नावात भर पडली आहे.

विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर भुसावळातील अर्जुना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.