प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्टेशनवर व्यापक मॉक ड्रिल :

सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि समन्वयाची कसोटी

भुसावळ ( प्रतिनीधी ) –
प्रजासत्ताक दिनानिमित्त संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात व्यापक मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या सरावामुळे काही काळ स्टेशन परिसरात कडेकोट सुरक्षा व सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखणे आणि सुरक्षा यंत्रणांची तत्परता तपासणे हा या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश होता.
सदर मॉक ड्रिल सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत राबविण्यात आला. या सरावात रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) जळगाव, गुप्तचर विभाग (आयबी), अग्निशामक दल, नगरपालिका रुग्णालयाचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांनी समन्वय साधत सक्रिय सहभाग नोंदवला.

मॉक ड्रिलदरम्यान संभाव्य दहशतवादी धोका, आग लागणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांची सुरक्षित बाहेर काढणी, गर्दीचे व्यवस्थापन, जखमींना तातडीने प्राथमिक व वैद्यकीय उपचार, तसेच अग्निशमन व सुरक्षा यंत्रणांची भूमिका यांचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. प्रत्येक टप्प्यावर यंत्रणांमधील समन्वय, प्रतिसाद देण्याचा वेग आणि कार्यक्षमतेची कसोटी पाहण्यात आली.
या सरावादरम्यान रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होते. पूर्वनियोजित आराखड्यानुसार परिस्थिती हाताळण्यात आली. मॉक ड्रिल यशस्वीरीत्या पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या मॉक ड्रिलमुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, आपत्कालीन प्रसंगी विविध विभागांनी एकत्रितपणे कशा पद्धतीने कार्य करावे याचे प्रभावी प्रशिक्षण मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे प्रवाशांमध्येही सुरक्षिततेबाबत विश्वास आणि जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले.