जलंब स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी ब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल, तर काही रद्द :

.भुसावळ ( प्रतिनिधी )-

भुसावळ–बडनेरा रेल्वे विभागातील जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लूप लाईनच्या विस्तारासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ३० जानेवारी २०२६ रोजी रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम काही प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.

या कालावधीत काही गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. त्यामध्ये अजमेर–पुरी एक्सप्रेस (गाडी क्र. 20824) सुमारे २ तास ३० मिनिटे, अम्ब अंदौरा–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (22710) २ तास, गोंदिया–कोल्हापूर एक्सप्रेस (11040) २ तास तसेच हजूर साहिब नांदेड–जम्मू तवी एक्सप्रेस (12751) सुमारे १ तास ३० मिनिटे नियमनात राहणार आहेत.

याशिवाय काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ–बडनेरा मेमू (61101), बडनेरा–भुसावळ मेमू (61102), भुसावळ–वर्धा एक्सप्रेस (11121), वर्धा–भुसावळ एक्सप्रेस (11122) तसेच बडनेरा–नाशिक रोड विशेष (01211) या गाड्या ३० जानेवारी २०२६ रोजी रद्द राहणार आहेत. तर नाशिक रोड–बडनेरा विशेष (01212) ही गाडी २९ जानेवारी २०२६ रोजी रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी गाड्यांची माहिती तपासण्याचे आवाहन केले असून, पायाभूत सुविधा सुधारणा व सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.