भुसावळ येथे बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी विविध उपक्रमांनी साजरी

भुसावळ( प्रतिनिधी )-
येथील बाजारपेठ पोलिस स्टेशन चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी (सोनवणे) यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा व लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी कट्टर शिवसैनिक तसेच शिवभोजन केंद्र चालक उमाकांत शर्मा (नमा) व त्यांचे पुत्र पियुष शर्मा यांच्या वतीने स्टेशन रोड परिसरात गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी १२५ जणांना मोफत शिवभोजन देण्यात आले. यामध्ये पालक पनीर भाजी, चपाती, वरण-भात तसेच बुंदी लाडू यांचा समावेश होता.

तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारानुसार एक दिवस अगोदर शिवसेना शहरप्रमुख गणेश सोनवणे यांच्या वतीने गोरगरीब, बेसहारा व अनाथ नागरिकांना रात्री उबदार कंबलचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रा. उत्तम सुरवाडे, प्रा. दिलीप सुरवाडे, शहरप्रमुख मकबूल शेख, उज्वला बागुल, नगरसेवक सचिन पाटील, अकिल पिंजारी, सिकंदर भाई, योगेश बागुल, रमेश खरारे, नाना मोरे, निलेश चौधरी, अनुप खोब्रागडे, मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना भुसावळ शहर व सहकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.