तांदुळवाडीतील पाच तरुणांची संरक्षण दलात निवड; ग्रामस्थांकडून जल्लोषात मिरवणूक

भडगाव (प्रतिनिधी ) –

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावातील पाच तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाल्याने गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणूक काढून जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.

निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), मयूर नाना पवार (सीआयएसएफ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ), गौरव अनिल पाटील (बीएसएफ) व अनंत तुकाराम मोरे (इंडियन नेव्ही) यांचा समावेश आहे.

या प्रसंगी अशोक परदेशी व प्रा. प्रशांत पाटील यांच्या हस्ते जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या तरुणांनी घेतलेली मेहनत, चिकाटी व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मिरवणुकीत तरुण मंडळींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.