देवगिरी कल्याण आश्रमतर्फे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न :

भुसावळ ,(प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने दि. २० जानेवारी रोजी भुसावळ येथील जळगाव रोडवरील मरीमता मंदिर परिसरातील भिल्ल वस्तीमध्ये आदिवासी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील आदिवासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त अंदाजे २५ ते ३० महिला व मुली उपस्थित होत्या. याशिवाय परिसरातील इतर महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. सौ. मंजुषा कुलकर्णी यांनी संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व महिलांना समजावून सांगितले. महिलांमधील एकोपा, सन्मान व परंपरेचे जतन याबाबत त्यांनी मोलाचे विचार मांडले.

कार्यक्रमाला ॲड. सौ. प्रतिमा अग्रवाल व सौ. वंदना रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही महिलांशी संवाद साधत तीळगुळ व हळदीकुंकू दिले आणि साडी वाटप केले. देवगिरी कल्याण आश्रमच्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वच स्तरातून कौतुकास पात्र ठरला.