महाव्यवस्थापकांनी भुसावळ येथे विविध सुविधांची केली तपासणी व उद्घाटन :

भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ येथे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी रूटीन ओव्हरहॉलिंग (ROH) शेड तसेच ओएचई डेपोची सखोल तपासणी केली. यावेळी ओएचई डेपोमध्ये २x२५ केव्ही मॉडेलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय भुसावळ येथील रेल्वे वसाहत आणि नवीन अधिकारी विश्रामगृहाचेही उद्घाटन करण्यात आले.

तपासणी दरम्यान महाव्यवस्थापकांनी विविध महत्त्वाच्या पुस्तिकांचे अनावरण केले. यामध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी हँडबुक, विनंतीवर बदली संकलन (Request Transfer Compendium), विद्युतीकरण कामांसाठी हँडबुक, पॉइंट्समनसाठी अध्ययन साहित्य, स्थानक व्यवस्थापकांसाठी ‘स्टेशन मार्गदर्शिका’, स्थानक व्यवस्थापकांसाठी कवच प्रशिक्षण हँडबुक तसेच शंटिंगसाठी सर्वसाधारण नियमांवरील माहितीपत्रक यांचा समावेश आहे.

श्री. गुप्ता यांनी शाखा अधिकाऱ्यांशी संवाद साधताना संरक्षा, देखभाल, गुणवत्ता आणि प्रशिक्षण (SMQT) यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याबाबत माननीय रेल्वेमंत्र्यांचा असलेला भर अधोरेखित केला. त्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

अमृत भारत स्थानकांवरील कामांची पाहणी

महाव्यवस्थापकांनी नांदगाव आणि पाचोरा स्थानकांवरील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. प्रवाशांशी संबंधित सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

लोकप्रतिनिधींशी संवाद

या दौऱ्यादरम्यान महाव्यवस्थापकांनी माननीय आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींशी भेट घेऊन विविध रेल्वे विषयांवर सविस्तर चर्चा केली.

तपासणीदरम्यान स्वच्छतेची मानके, रेल्वे गाड्यांची वेळपालन स्थिती तसेच सुरू असलेल्या देखभाल व पायाभूत सुविधा उन्नतीकरणाच्या कामांची प्रगती यांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षितता, विश्वासार्हता आणि आंतरविभागीय समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.

सुरक्षित रेल्वे गाडी परिचालन, पायाभूत सुविधांची विश्वासार्हता आणि प्रवासी-केंद्रित सेवांचे महत्त्व अधोरेखित करत महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय रेल्वेची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी कटिबद्धतेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणीदरम्यान श्री. पुनीत अग्रवाल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग, तसेच मुख्यालय आणि भुसावळ विभागातील विविध विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.