परंपरेला पर्यावरणाची जोड : महिला क्रीडा मंडळातर्फे हळदीकुंकूत रोपवाटप :

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा आगळावेगळा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपरिक वाण देण्याऐवजी महिलांना झाडांची रोपे देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पुढील वर्षी ज्यांचे रोप उत्तम प्रकारे रुजेल, अशा महिलांना बक्षिसे देण्याची घोषणा मंडळातर्फे करण्यात आली.

सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, झाडांची तोड आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हळदीकुंकूच्या माध्यमातून महिलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या अभिनव उपक्रमाला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला क्रीडा मंडळ भुसावळच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांच्यासह प्राची राणे, प्रभा पाटील, लता ढाके, प्रमिला राऊळ, मंगला पाटील, किरण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास दीपाली सराफ, भारती चौहान, माधुरी गव्हाळे, रश्मी ठोसर, अनिता सपकाळे, वैशाली बऱ्हाटे, स्मिता राऊळ यांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम रघुकुल कॉलनीतील सोन्या मारुती मंदिरात संपन्न झाला.