भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज निर्णायक वळण मिळाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात तीन प्रस्ताव सादर करण्यात आले असून, माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय ‘धक्कातंत्र’ वापरल्याची चर्चा रंगली आहे.

सध्याच्या नगरसेवकांच्या संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक स्वीकृत नगरसेवक सहजपणे नियुक्त होऊ शकतो, तर दुसऱ्या जागेसाठी संख्याबळ कमी असले तरी संतोष चौधरी प्रयत्नशील असल्याने राजकीय चमत्काराची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, एका ऐवजी तब्बल तीन प्रस्ताव सादर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संतोष चौधरी किंवा त्यांचे बंधू अनिल चौधरी स्वीकृत नगरसेवक बनणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र आज सादर झालेल्या प्रस्तावांमध्ये अनिल चौधरी यांचे नाव नसून स्वतः माजी आमदार संतोष चौधरी यांच्याच नावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना सभागृहात भक्कम पाठबळ मिळावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे माजी आमदार व नगराध्यक्षपद भूषवलेले संतोष चौधरी आता प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून सभागृहात प्रवेश करणार का, याबाबत औत्सुक्य शिगेला पोहोचले आहे.
दुसरा प्रस्ताव हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. उत्तमराव सुरवाडे यांच्या नावाचा आहे. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत गायत्री भंगाळे यांच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवडीनंतर समन्वयक म्हणून त्यांनी अल्पावधीत प्रभावी कामगिरी केल्याने त्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे मानले जात आहे.
लक्षणीय बाब म्हणजे प्रा. सुरवाडे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करून संतोष चौधरी यांनी आघाडीधर्म पाळत सकारात्मक राजकीय संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, “अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे सदस्य नगरपालिकेत असावेत,” अशी अपेक्षा भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मागणीला अप्रत्यक्षपणे ‘टाळी’ दिल्याची चर्चा आहे. आता यावर भाजपची प्रतिक्रिया काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
तिसरा प्रस्ताव हा अनिल चौधरी यांच्या कन्या ॲड. नंदिनी चौधरी यांच्या नावाचा आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडिलांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. संघटन कौशल्य व वक्तृत्व लक्षात घेता त्यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्या नावाचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नुकत्याच निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदाची निवड उद्या, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेत होणार आहे. या प्रस्तावांपैकी एक किंवा दोन सदस्य नियुक्त करण्याची शक्यता असून, संतोष चौधरी नेमके कुणाला प्राधान्य देतात, याचे उत्तर उद्याच मिळणार आहे.
दरम्यान, भाजपकडूनही तीन नावे सादर करण्यात आली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष चौधरी उर्फ दाढी यांनीही स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. अपक्षांचे पाठबळ त्यांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक सदस्य निश्चित असल्याचे चित्र असताना, पाचव्या जागेसाठी प्रा. उत्तमराव सुरवाडे आणि संतोष चौधरी उर्फ दाढी यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे.
या लढतीत नेमकी बाजी कोण मारणार आणि संतोष चौधरी पुन्हा एकदा राजकीय जादू दाखवणार का, याकडे आता संपूर्ण भुसावळचे लक्ष लागले आहे.


