मुंबई :
राज्यातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

निवडणुकांची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी 22 जानेवारी, तर 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त गेलेल्या काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकायू दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे अधिक वेळेची मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून, 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक असणार आहे.
उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नसून, त्याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असेही मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.


