भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजवण्यात न आल्यामुळे भुसावळकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शांती नगर परिसरात ठेकेदाराकडून करण्यात आलेले निकृष्ट पुनर्भरण नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असून, रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वरवरचे पुनर्भरण, अपघातांना आमंत्रण
शहरात पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांसाठी पाईपलाईन टाकण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडून गांभीर्याने पाळली जात नसल्याचे चित्र आहे. शांती नगर भागात पाईपलाईनसाठी लांबच लांब चाऱ्या खोदून काम आटोपल्यानंतर त्या केवळ माती व दगड टाकून वरवर बुजवण्यात आल्या आहेत. परिणामी वाहनांची वर्दळ व पावसामुळे ही माती खचून मोठे खड्डे तयार झाले आहेत.
दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका
या चाऱ्या नीट न बुजवल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी चाऱ्यांचा अंदाज येत नसल्याने रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच धोकादायक बनत असून, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
फक्त शांती नगर नाही, संपूर्ण शहरात समस्या
ही समस्या केवळ शांती नगरपुरती मर्यादित नसून, शहरातील ज्या-ज्या भागांत पाईपलाईनची कामे झाली आहेत, तिथेही अशीच अवस्था आहे. संबंधित विभागाने कामाची पाहणी करून ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश देणे अपेक्षित असताना अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे.
‘जसा रस्ता फोडला, तसाच करून द्या’ — नागरिकांची मागणी
पालिकेने तात्काळ हस्तक्षेप करून चाऱ्या योग्य पद्धतीने भराव्यात, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. ‘जसा रस्ता फोडला, तसाच सुस्थितीत करून द्या’ ही मागणी आता जोर धरू लागली आहे.


