सीसीटीव्हीद्वारे वाहनधारकांवर पोलिसांची कडक नजर; मोबाईलवर येणार ई-चलन
डीवायएसपी केदार बारबोले यांचा अभिनव उपक्रम

भुसावळ ( प्रतिनिधी) –
भुसावळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण तसेच बेशिस्त वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी भुसावळ पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत थेट ऑनलाईन दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून आता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट ई-चलन पाठवले जाणार आहे.
शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते व संवेदनशील ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यांचे थेट निरीक्षण डीवायएसपी कार्यालयातील कंट्रोल रूममधून केले जात आहे. येथे विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून तो सातत्याने सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलीस कर्मचारी नसले तरी ‘तिसऱ्या डोळ्या’द्वारे नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
अशी होणार कारवाई
ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आदी प्रकारचे नियमभंग सीसीटीव्हीत आढळताच संबंधित वाहनाचा क्रमांक नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर मोटार वाहन कायदा व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार संबंधित वाहनधारकाला ऑनलाईन ई-चलन पाठवले जाणार असून, दंडाची पावती थेट मोबाईलवर प्राप्त होणार आहे.
या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीत शिस्त निर्माण करणे, गुन्हेगारी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच प्रत्यक्ष रस्त्यावर पोलीस नसतानाही नियम पाळण्याचा धाक निर्माण करणे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहनधारकांना पोलिसांचे आवाहन
“शहराची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सीसीटीव्हीद्वारे २४ तास वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाईल. नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.
वाहतूक शाखेची संयुक्त अंमलबजावणी
हा उपक्रम डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले व त्यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात येत आहे. कंट्रोल रूममधून मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ कारवाई केली जात असून, या मोहिमेमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहनधारकांवर वाहन जप्तीची कारवाई होण्याचीही शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.


