फ्रीजच्या अचानक स्फोटामुळे भीषण आग; वडील व दोन मुलांचा मृत्यू ;

मुंबई ( गोरेगाव पश्चिम)

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात फ्रीजच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. भगतसिंग नगर येथील एका सोसायटीत ही दुर्घटना पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत संजोग पावस्कर (वडील), हर्षदा पावस्कर (वय 19) आणि कुशल पावस्कर (वय 12) यांचा मृत्यू झाला. कुटुंब गाढ झोपेत असतानाच घरातील फ्रीजचा जोरदार स्फोट झाला. काही क्षणांतच संपूर्ण घराला आग लागली. घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्यामुळे आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.

आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले. 12 वर्षांचा कुशल आग टाळण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन लपला होता. मात्र वाढत्या धुरामुळे आणि आगीच्या तीव्रतेमुळे तिघांचाही गुदमरून व होरपळून मृत्यू झाला.

घरातून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसताच शेजाऱ्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत तिघेही मृत अवस्थेत आढळून आले.

मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही जणांचा मृत्यू आगीमुळे निर्माण झालेल्या दाट धुरामुळे गुदमरून झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फ्रीजच्या स्फोटाचे नेमके कारण शोधले जात आहे.