भुसावळ (प्रतिनिधी):
शहरातील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला पाणीप्रश्न आता सुटण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात सत्ताधारी गटाचे समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केलेल्या आवाहनाला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी पाठिंबा दिल्याने, पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे भुसावळकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरात यापूर्वी दहा ते बारा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता चार ते पाच दिवसांत होत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले जात आहे. पाणीप्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, प्रत्यक्षात मात्र समन्वयातून प्रश्न मार्गी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात प्रा. उत्तम सुरवाडे यांनी भुसावळच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या समस्यांची संयुक्तपणे पाहणीही केली.
माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करत दहा-बारा दिवसांनी मिळणारे पाणी आता पाच-सहा दिवसांत उपलब्ध करून देणार आहे. आगामी काळात पाणीपुरवठा आणखी नियमित करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
राजकीय वैमनस्याचे दुष्परिणाम भुसावळकरांनी यापूर्वी अनुभवल्याने, पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर तरी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहराला आता वाद नव्हे तर विकास हवा असून पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी उचललेले हे पाऊल आश्वासक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दरम्यान, भाजप नगरसेवकांनी केलेल्या आरोपांबाबत नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी माझे उत्तर शब्दांत नव्हे तर कामातून देणार आहे. आधी करून दाखवते, मग सांगते. कोणी कायदेशीर मार्गाने विरोध करत असेल तर त्यावर आक्षेप नाही; मात्र विकासकामांना अडथळे आणू नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात शहरवासियांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा तसेच अन्य नागरी समस्यांचेही निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.


