भुसावळात महिलांसाठी ‘एसी’ शौचालयांचा निर्णय : नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा ग्राऊंड झिरो अ‍ॅक्शन मोड : छत्रपती शिवाजी महाराज संकुलाची दुरवस्था उघड, बंद शौचालयांचे कुलूप तत्काळ उघडण्याचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी) – केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या सोडवण्याचा नवा पायंडा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सुरू केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची दयनीय अवस्था पाहता शुक्रवारी त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांसह थेट पाहणी केली. यावेळी महिलांसाठी शौचालय उपलब्ध असूनही त्याला कुलूप लावलेले आढळताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कुलूप उघडण्याचे आदेश दिले.

शौचालयाची झालेली दुर्दशा पाहून नगराध्यक्षा संतप्त झाल्या. महिलांची गैरसोय लक्षात घेता त्यांनी पालिका प्रशासनाला तातडीने दुरुस्ती व स्वच्छतेची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. इतकेच नव्हे तर भुसावळ शहरात महिलांसाठी वातानुकूलित (एसी) शौचालयांची उभारणी करण्याचा मोठा निर्णयही त्यांनी याच वेळी जाहीर केला.

महिलांच्या समस्येला थेट भिडणारी नगराध्यक्षा

कारभार स्वीकारल्यानंतर कार्यालयापुरते मर्यादित न राहता नगराध्यक्षा भंगाळे यांनी ‘ग्राऊंड रिअॅलिटी’ जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप गटनेते युवराज लोणारी व अन्य सहकारी नगरसेवकांसह त्यांनी बंद अवस्थेतील महिला शौचालयाची पाहणी केली. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून महिलांची होणारी कुचंबणा त्यांच्या लक्षात आली.

शहरात उभारणार एसी शौचालये

या परिसरात महिलांसाठी एकही कार्यरत शौचालय नसल्याने भगिनी वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले. यावर उपाय म्हणून नगराध्यक्षा भंगाळे यांनी नगरपालिका प्रशासनाला शहरात वातानुकूलित शौचालयांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. हे काम लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
विकासकामांचीही पाहणी
पाहणीदरम्यान अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, प्रतोद उल्हास पगारे, उपगटनेते सोहेल खान पठाण, नगरसेवक सचिन अण्णा पाटील, अकील पिंजारी यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
“बोलण्यापेक्षा कृतीतून काम दिसेल”
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे म्हणाल्या, “फक्त बोलून नाही तर कृतीतून शहरात बदल घडवून आणणार आहोत. नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. विशेषतः महिलांची कुचंबणा थांबवण्यासाठी शहरात वातानुकूलित शौचालयांची उभारणी केली जाईल. केवळ कॅबिनमध्ये बसून समस्या सुटत नाहीत, म्हणून मी स्वतः जाऊन त्या समजून घेणार आहे.”

महिलांच्या प्रश्नांबाबत घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे नगराध्यक्षा भंगाळेंच्या कार्यशैलीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.