भुसावळ (प्रतिनिधी)- नगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक राज विजय चौधरी यांनी पदभार स्वीकारताच जनहिताच्या कामांना प्राधान्य देत प्रभावी कार्यवाही सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक २० मध्ये अनेक ठिकाणी वीज वाहिन्या लोंबकळत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक चौधरी यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समस्या निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला.
तसेच प्रभागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच दोन नवीन डीपी (डिस्ट्रीब्युशन पॉईंट) बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नगरसेवक चौधरी यांनी संपूर्ण प्रभागाची प्रत्यक्ष पाहणी करून ज्या ठिकाणी दिवाबत्तीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वायरमनला तात्काळ सूचना दिल्या. यावेळी ते स्वतः उपस्थित राहून दुरुस्तीची कामे करून घेत असल्याचेही दिसून आले.
याशिवाय प्रभागातील जुने केबल, लोंबकळलेल्या तारा तसेच मेंटेनन्सअभावी जीर्ण झालेल्या वीज पोलची दुरुस्ती करून नवीन केबल बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन नवीन डीपी बसवण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेपुढे सादर करण्यात आला असून प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे.
निवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नगरसेवक राज विजय चौधरी यांनी जनतेचा विश्वास संपादन केल्याची सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


