विकासकामांमध्ये अडथळा आणल्यास थेट गुन्हा दाखल करणार -१४ वर्षे सत्ता असताना पाणीप्रश्न आठवला नाही का ? – नगराध्यक्षा गायत्री भंगाळे प्रतिप्रश्न

भुसावळ (प्रतिनिधी):
भुसावळकरांनी विकासाला कौल दिल्यानेच एका गरीब घरातील मुलीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मात्र काहींना पराभव सहन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील विकासकामांमध्ये कोणीही अडथळा आणण्याचा, दबाव टाकण्याचा किंवा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांनी दिला.

माजी आमदार संतोष चौधरी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या. शहरातील संतोषी माता मंदिराजवळ अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाला स्थगिती कोणी व का दिली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलकुंभाच्या कामाबाबत खुलासा

प्रभाग क्रमांक १९ मधील संतोषी माता मंदिराजवळ सुरू असलेले जलकुंभाचे काम नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार थांबविण्यात आले का, असा प्रश्न ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने उपस्थित केला असता, नगराध्यक्षा भंगाळे यांनी आपण २३ तारखेलाच पदभार स्वीकारल्याचे सांगितले. आपण मुख्याधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी सहकार्य राहील, मात्र चुकीची कामे होऊ दिली जाणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विकासाला प्राधान्य, पाणीपुरवठ्याचे वचन

निवडणुकीदरम्यान भुसावळकरांना दिलेले वचन आपण निश्चितपणे पाळणार असून शहरात तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्षा म्हणाल्या. विकासकामे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही त्यांनी नमूद केले.

पालिकेत काम करताना कोणी दबाव, दडपशाही किंवा अडथळे निर्माण केल्यास त्याचा कडाडून विरोध केला जाईल आणि गरज पडल्यास गुन्हा दाखल करण्यासही मागे-पुढे पाहिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झालेल्या चांगल्या कामांप्रमाणेच दर्जेदार विकासकामे करण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.