प्रभाग १० (क) मध्ये परिवर्तनाची मशाल पेटली; डॉ. वृषाली सोनवणे ठरणार इतिहास घडवणारा निर्णायक चेहरा

नाशिक (प्रतिनिधी ) –
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (क) हा यंदा संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार डॉ. वृषाली नरेश सोनवणे यांच्या प्रचारामुळे या प्रभागात परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवत आहे. “यावेळी फक्त निवडणूक नाही, तर बदल घडणार,” अशी ठाम भावना नागरिकांमध्ये दिसून येत असून, डॉ. सोनवणे यांच्या प्रचाराची मशाल दिवसेंदिवस अधिकच धगधगत आहे.

उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक भान जपणाऱ्या उमेदवार म्हणून ओळख असलेल्या डॉ. वृषाली सोनवणे यांना प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि विश्वासार्ह प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत या प्रभागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांनी जनतेकडे केलेले दुर्लक्ष आज मतदारांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. विशेषतः कोरोना काळात नगरसेवकांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

कोरोनाच्या संकटात मात्र डॉ. वृषाली सोनवणे या स्वतः डॉक्टर असल्याने ‘कोरोना योद्धा’ म्हणून रुग्णसेवा, मार्गदर्शन आणि मदतीसाठी सातत्याने उपलब्ध होत्या. संकटाच्या काळात जनतेसोबत उभ्या राहिलेल्या उमेदवाराची आठवण आज मतदार ठेवून आहेत. “जेव्हा गरज होती तेव्हा त्या आमच्यासोबत होत्या,” ही भावना त्यांच्या प्रचारात ठळकपणे दिसून येते.

डॉ. सोनवणे या प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण व्यवस्था, महिला सशक्तीकरण, युवकांना संधी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या मुद्द्यांवर त्या स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडत आहेत. डोअर-टू-डोअर प्रचारादरम्यान त्या प्रत्येक घरातील समस्या ऐकून घेत असून, “फक्त आश्वासन नव्हे, तर कृती” हा त्यांचा ठाम संदेश मतदारांना भावत आहे.

विशेष म्हणजे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये डॉ. सोनवणे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने मते मिळवली होती; मात्र अत्यंत कमी मतांच्या फरकामुळे त्यांना विजयापासून दूर राहावे लागले. यंदा मात्र ती चूक दुरुस्त करण्याच्या निर्धाराने मतदार एकवटत असल्याचे चित्र आहे.

सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन डॉ. सोनवणे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर पदयात्रा, छोट्या बैठका, संवाद सभा आणि घराघरांत भेटी यांच्या माध्यमातून प्रचाराला मोठा वेग मिळाला आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात मैदानात उतरले असून, प्रभाग १० (क) मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

एकूणच, “गायब नगरसेवक नव्हे, तर कायम उपलब्ध लोकप्रतिनिधी हवा,” ही जनतेची भावना यंदा निर्णायक ठरणार असून, डॉ. वृषाली सोनवणे यांच्या रूपाने प्रभाग १० (क) मध्ये इतिहास रचला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिवर्तनाची मशाल पेटली असून, निकालाच्या दिवशी ती विजयात रूपांतरित होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.