भुसावळ (प्रतिनिधी)-:
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) तर्फे सन 2026 साठी देण्यात येणारे जीवनगौरव व दर्पणकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

भुसावळ येथील दिव्य मराठी दैनिकाचे वरिष्ठ रिपोर्टर श्रीकांत सराफ यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेतील निष्ठावंत, निर्भीड व समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात येतो. पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जात असून, यंदा या पुरस्कारांचे वितरण महिनाअखेरीस जळगाव येथे होणार आहे.
31 वर्षांची प्रदीर्घ पत्रकारिता
श्रीकांत सराफ हे गेल्या सुमारे 31 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. लोकमत, सकाळ आणि दिव्य मराठी या नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी कार्य केले आहे. विविध सामाजिक प्रश्न, अन्यायग्रस्तांचे प्रश्न आणि गुन्हेगारी विषयांवरील निर्भीड वृत्तांकनासाठी ते परिचित आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दर्पणकार पुरस्कारार्थी
दर्पणकार पुरस्कार खालील पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे —
मुद्रित माध्यम:
सचिन जोशी (सकाळ – ब्यूरो चीफ), शशिकांत पाटील, गणेश सुरसे, दीपक महाले, प्रसाद धर्माधिकारी (नशिराबाद), डॉ. गोपीचंद सोरडे, दीपक पवार (लोहारा)
ऑनलाईन मीडिया:
इम्तियाज अहमद, जुगल पाटील, शुभदा नेवे, रवी गोरे, सोनम पाटील, दिलीप पाटील, जितेंद्र कोतवाललोकहित जपणाऱ्या पत्रकारांचा सन्मान
सत्य, निर्भीडता व लोकहित जपणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जात असल्याचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी सांगितले. आगामी काळातही पत्रकारांच्या सन्मानासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


