भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास मंगळवार, दिनांक ६ पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यावसायिक कौशल्यांना वाव देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दिनांक ६ रोजी विविध स्पर्धांसह पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून, विद्यार्थी विविध भारतीय पोशाख सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत. याच दिवशी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना देण्यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दिनांक ७ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ‘नृत्य स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकल गायन, समूहगायन, एकल नृत्य, समूह नृत्य, मिमिक्री आदी विविध कला प्रकार सादर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा विविध उपक्रमांचा या स्नेहसंमेलनात समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक, चेअरमन श्री. महेश भाऊ फालक, सेक्रेटरी श्री. विष्णू भाऊ चौधरी, कोषाध्यक्ष श्री. संजय कुमारजी नाहाटा तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील व प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, स्नेहसंमेलनाच्या समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.


