नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, — क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी घालून दिलेल्या शिक्षणाच्या वसा व वारशामुळे आज अनेक स्त्रिया शिक्षणात अग्रेसर झाल्या असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मात्र आजही अनेक गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत शैक्षणिक साहित्याची पूर्तता केली. हे पाऊल म्हणजे आजच्या काळातील “सावित्रीच्या सावित्रींनी” उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा पाटील होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच नीता वानखेडकर यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार समजावून सांगत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमास नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, माधुरी शिंपी, आशा मौर्य, प्रदीप शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व अंमलबजावणी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.