भुसावळ ( प्रतिनिधी )-

भुसावळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात रविवारी (४ जानेवारी) दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने चालकाने वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला असून चालक थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी विकी साबने हे आपल्या MH 19 CF 3778 क्रमांकाच्या कारमधून प्रवास करत होते. त्यांनी जवळील पेट्रोल पंपावरून इंधन भरल्यानंतर घराकडे जात असताना बसस्थानक परिसरात कारच्या इंजिनमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर उडी घेतली.
चालक बाहेर पडताच काही क्षणांतच कारने भीषण पेट घेतला. भररस्त्यात जळती कार पाहून परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली व पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली.
या आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वर्दळीच्या वेळेत व भरवस्तीत ही घटना घडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.


