मुंबई रेल्वेने बनावट युटीस (UTS) तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली असून, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी वातानुकुलीत लोकलमध्ये तिघे प्रवासी बनावट सीझन तिकिटांसह पकडण्यात आले.

मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीई) . प्रशांत कांबळे यांनी संध्याकाळी १८.४५ वाजता परळ–कल्याण AC लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एक तरुणी आणि दोन तरुणांकडे संशयास्पद तिकिटे आढळल्याने तपास सुरू केला.
प्रवाशांनी मोबाईलमधील “माय फाइल्स–डॉक्युमेंट्स” फोल्डरमधून युटीस जनरेटेड तिकिटे दाखवली. मात्र, तिकीट तपासकांनी याच तिकिटांना UTS अॅपमधून उघडण्याची विनंती केली असता ती तिकिटे तिथे उपलब्ध नसल्याने त्यांना संशय आला.
सखोल तपासणीमध्ये असे स्पष्ट झाले की तिघांकडे असलेल्या सर्व तिकिटांवर एकच UTS क्रमांक – XOOJHN4569 होता. प्रत्यक्षात प्रत्येक UTS तिकिटाचा क्रमांक वेगळा असतो. मोबाईल नंबरद्वारे पडताळणी केली असता या क्रमांकांवर कोणतीही तिकिटे जारी न झाल्याची खात्री पटली.
याप्रसंगी. निरज तलरेजा, अथर्व बाग आणि कु. अदिती मंगलुरकर अशी ओळख पटलेल्या प्रवाशांना तात्काळ पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (GRP), कुर्ला यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील चौकशीत हेही समोर आले की ही तिकिटे एआयच्या साहाय्याने बनावटरीत्या तयार करण्यात आली होती.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) कलम ३१८/२, ३३६/३, ३३६/४, ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोषींना दंड किंवा कमाल ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
. प्रशांत कांबळे यांच्या तत्पर कारवाईमुळे आणखी एक बनावट तिकिट रॅकेट उघडकीस येण्यास मदत झाली असून, पुढील तपास सुरु आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ अधिकृत मार्गांनी — बुकिंग काउंटर, एटीव्हीएम किंवा अधिकृत UTS मोबाईल अॅपद्वारेच तिकिटे खरेदी करावीत.
बनावट तिकिटांवर प्रवास करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकरणांवर मध्य रेल्वे कठोर कारवाई करत राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


