जळगाव( प्रतिनिधी ): जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून खाजगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश उर्फ भैय्या वाघ हे नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. पिंप्राळा परिसरात एका घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भैय्या वाघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिवसैनिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली. सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या भैय्या वाघ यांच्या मृत्यूची बातमी दुपारी कुटुंबीयांना समजली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


