भुसावळ (प्रतिनिधी ) – हाराज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशामुळे चिंताग्रस्त असलेल्या शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या १५ मार्च २०२५ च्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर संचालयाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी आदेश काढून अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर निश्चित करून समायोजन प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, संचालयाचा २०/११/२०२५ चा आदेश तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच अतिरिक्त समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तथापि, इ. ९ वी व इ. १० वीच्या शिक्षकांबाबत शासनाने तातडीने योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अन्यथा शिक्षकांना न्याय मिळणार नाही, असे शिक्षक संघटनांचे मत आहे. सद्यस्थिती ही केवळ “तात्पुरती मलमपट्टी” असून ती मान्य नाही, असा स्पष्ट सूर संघटनांनी व्यक्त केला आहे.
ही माहिती शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते व भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह. दलाल यांनी पत्राद्वारे दिली.


