भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असून शुक्रवार, 28 रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातील स्टॉन्ग रूममध्ये मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हीएम यंत्रांचे सिलींग करण्यात आले. सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया तब्बल 140 कर्मचार्यांच्या उपस्थितीत पार पडली असून एकूण 420 मतदान यंत्रांना सील करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवले.

1 डिसेंबरला थांबणार प्रचार मोहीम
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची माघार व चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरात प्रचाराचा जोर वाढला आहे. यासोबतच महसूल व पालिका यंत्रणाही निवडणूक तयारीत गुंतली आहे.
20 टेबलांवर दिवसभर सिलींग प्रक्रिया
तहसील कार्यालयाच्या स्टॉन्ग रूममध्ये ईव्हीएम सिलींग करताना 20 टेबलांची सोय करण्यात आली होती. 100 कर्मचारी सिलींग कामासाठी 40 कर्मचारी यंत्रे ने-आण करण्यासाठी अशा एकूण 140 जणांनी दिवसभर सिलींगची जबाबदारी पार पाडली. दोन दिवसांपूर्वीच मतदान केंद्रनिहाय यंत्रे मांडणी करण्यात आली होती. दिवसभर अखंडपणे हे काम सुरू राहिले.
सहायक अधिकारी राजेंद्र फातले आणि पालिकेचे अधिकारीही या प्रक्रियेत सक्रिय होते.
150 पेक्षा अधिक कर्मचार्यांसाठी जेवणाची व्यवस्था
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान चहा , नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळचा चहा , रात्रीचे जेवणअशी 150 हून अधिक कर्मचार्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. अन्नाची सेवा टप्प्याटप्याने करून कर्मचारी पुन्हा सिलींग कामात सहभागी होत होते.
निवडणूक निरीक्षकांची पाहणी
सिलींग प्रक्रियेच्या वेळी निवडणूक निरीक्षक बाबासाहेब पारधी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली.
तेव्हा आवश्यक यंत्रांची संख्या, सिलींगची पद्धत याबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित कर्मचार्यांना सूचना केल्या.त्यानंतर पारधी यांनीरेल्वे नॉर्थ कॉलनी ,रेल्वे स्कूल , संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालययेथील मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, महेश चौधरी, वैभव पवार, पंकज मदने आदी उपस्थित होते.
सोमवारी मतदान साहित्य वितरण
1 डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचार्यांना ईव्हीएम तसेच आवश्यक साहित्य तहसील कार्यालयातून देण्यात येणार आहे.
वितरण सकाळी 10 वाजता सुरू होणार असून बूथनिहाय साहित्य देण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
कोणत्या स्टॉलवरून कोणते फॉर्म व कोणते साहित्य घ्यायचे, याचे नियोजन निर्णय अधिकारी पाटील यांनी पूर्वनियोजित केले आहे.
.


