भुसावळ ( उज्वला बागुल) : जळगाव जिल्ह्यात भुसावळ पालिकेची निवडणूक सर्वाधिक हाॅट ठरते आहे. भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संताेष चाैधरी, आमदार एकनाथ खडसे यांनी इथे प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गेल्या दहा वर्षांपासून भुसावळात फारसे सक्रीय नसलेले संताेष चाैधरी यांचे बंधू माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चाैधरी हे या निवडणुकीत आपल्या बंधूंसाठी ‘द वाॅल’ म्हणून बाजू सांभाळताहेत. दाेन दिवसांपूर्वी मंत्री संजय सावकारेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ‘काेण अनिल चाैधरी?’ अशा शेलक्या शब्दात उत्तर दिले हाेते. तेच जिव्हारी लागल्याने अनिल चाैधरी यांनी ही निवडणूक आता अंगावर घेतली आहे. ‘मंत्री संजय सावकारेंनी राजकारणात वेगवेगळ्या मार्गाने ‘माया’ जमवली आहे. त्यांची संपत्ती ८०० काेटींच्या पुढे आहे. त्याची कागदपत्रे मिळवण्यासाठी पाच ते सहा वकील आणि आठ दहा जणांची टिम कामाला लागली आहे. लवकरच त्यांचे ‘कारनामे’ चव्हाट्यावर आणू. हे करीत असताना आता जर काेणी आपल्याला खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना असे उत्तर देऊ की अख्खा महाराष्ट्र पाहात राहील अशा शब्दांत कणखर इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विराेधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिल चाैधरींनी माध्यमांसमाेर मंत्री सावकारेंचे केले वस्त्रहरण!
- आताचे मंत्री असलेले संजय सावकारे हे वर्ष २००५मध्ये मुंबईत एका कंपनीत नाेकरी करीत हाेते. त्यांचे बंधू प्रमाेद सावकारे हे माझ्या साेबत आडत दुकानावर बसायचे. तेव्हा आमचे बंधू संताेषभाऊ चाैधरी हे आमदार झाले हाेते. त्यांना स्वीय सहाय्यक लागणार हाेता. तेव्हा प्रमाेद म्हणाला हाेता की आपला भाऊ मुंबईत आहे. त्याला बाेलावून घेऊन. त्याच्या शब्दाखातर बाेलवून त्यांना स्वीय सहाय्यक म्हणून संताेषभाऊंनी काम दिले हाेते.
- एकदा प्रमाेद सावकारे यांनी काही कारणास्तव बाटलीभर झाेपेच्या गाेळ्या खाल्ल्या हाेत्या. आपला मित्र असल्याने ताे वाचला पाहिजे म्हणून खांद्यावर घेऊन दवाखान्यात पाेहाेचवले हाेते. डाॅक्टर घ्यायला तयार हाेत नव्हते. त्या वेळी डाॅक्टरांशी भिडावे लागले हाेते. त्यानंतर प्रमाेदच्या घरात एक प्रसंग घडला हाेता. त्यात त्याच्यावर आणि कुटुंबातील काही जणांवर गुन्हे दाखल झाले हाेते. या दाेन्ही प्रसंगात मदत करणारा व्यक्ती अनिल चाैधरीच हाेता.
- सन २००९मध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला हाेता. तेव्हा संताेषभाऊ यांनी आपल्या साेबत राहिलेला कार्यकर्ता आमदार व्हावा म्हणून संजय वामन सावकारे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर मात्र सावकारे हे उपकार विसरले. हवा डाेक्यात गेल्याने त्यांनी वेळाेवेळी आम्हालाच खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. वाईटात वाईट करण्यावर ते टपून बसले पण आम्ही डगमगलाे नाहीत.
- भुसावळात मध्यंतरी एका कार्यक्रमात संजय वामन सावकारे यांनी आमचे बंधू संताेषभाऊ यांना ‘रावण’ म्हणून संबाेधले हाेते. तळपायाची आग मस्तकात गेली हाेती. मात्र, तेव्हा मी वेगळ्या गडबडीत अडकलाे हाेताे म्हणून उत्तर दिले नाही. अरे ज्यांनी तुम्हाला चालायला, बाेलायला, उभं राहायला शिकले त्यांना रावण म्हणतात. थाेडीफार शरमही वाटत नाही या कृतघ्न झालेल्या लाेकांना. आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावकारेंना जशास तसे उत्तर मिळेल.
- विधीमंडळात मंत्री संजय सावकारे हे जिल्ह्यासह इतर ठिकाणचे प्रश्न मांडतात. दुसरीकडे मात्र, त्यासाठी नानाविध माध्यमातून सेटिंग करणारी एक त्यांची यंत्रणाही आहे. आमच्या चाैधरी कुटुंबातील एका जणाला अशाच पद्धतीने सावकारेंनी नाडले आहे. पण त्यांचे नाव मी जाहीरपणे घेऊ शकत नाही. कारण ती व्यक्ती व्यवसायाला प्राधान्य देते. विनाकारण आपल्यामुळे त्याला त्रास नकाे म्हणून नाव टाळताे. वेळ आल्यावर सारे काही चव्हाट्यावर आणले जाईल.
- मंत्री संजय सावकारेंच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेनामी मालमत्ता आहे. त्यांची यादी काढली जाते आहे. ती मिळाल्यावर आणि त्यांच्या काळ्या कमाईत काेण काेण सहभागी आहे याची चाैकशी लावण्यासाठी ईडीकडे तक्रार करू. या अनुषंगाने काम सुरू केले आहे. आता माझा एकच अजेंडा आहे की अनिल चाैधरी काेण आहे? हे संजय वामन सावकारे यांना दाखवून देणार आहे. कारण मुले सज्ञान झाली आहेत. त्यांच्या पायावर उभी राहिली आहेत. आता नाे चिंता.
गायत्री भंगाळेंच्या पतीला धमकी आणि प्रलाेभने
मंत्री संजय सावकारेंचे निकटवर्तीय समजले जाणारे मनाेज बियाणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भुसावळ येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांचे पती यांना विविध प्रकारची प्रलाेभने दिली. आठ ते दहा वेळा त्यांच्या व्हाॅटसअपवर व साध्या माेबाइलवर काॅल केले आहेत. त्यात त्यांनी काय काय प्रलाेभने दिली हे मीडियासमाेर लवकरच मांडणार आहे. काही लाेकांकडून त्यांना धमक्याही दिल्या गेल्या. पण त्या आमच्या उमेदवार आहेत हे विराेधकांनी विसरू नये असे अनिल चाैधरी माध्यमांशी बाेलताना म्हणाले.
मंत्री सावकारे बाहेरून दिसता तस भाेळा नाही
मंत्री संजय सावकारे हा माणूस बाहेरून दिसताे तसा भाेळा नाही. कट-कारस्थान करून समाेरच्या व्यक्तीला संपवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. भुसावळ पालिकेत भाजपच्या अनेक दिग्गज लाेकांना त्यांनी उमेदवारी दिली नाही. उमेदवारी केली तर कामाची बिले काढू देणार नाही अशा धमक्या दिल्या आहेत. आमच्या नावाने दादागिरी, गुंडगिरीचा दिंडाेरा पिटणाऱ्या सावकारेंना लाेक कंटाळले आहेत. हळूहळू लाेक त्यांच्या विराेधात रस्त्यावर नक्कीच उतरतील. अती झाले की माती हाेतेच असेही अनिल चाैधरी म्हणाले.


