भुसावळ (उज्वला बागुल) : लोककल्याणासाठी पालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच ताब्यात येणे महत्त्वाचे आहे. मध्यंतरीच्या कालखंडात ज्यांना मी बोट धरून राजकारणात मोठं केलं त्यांनी माझ्या प्रतिमेला जोडे मारले. मात्र, ते त्यांनी प्रत्यक्षात समाजालाच मारले. आता हाच समाज त्यांना धडा शिकवणार हे विसरू नका. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच लोक आता फोन करुन सांगतात, ‘भाऊ आमच्या प्रभागात येऊ नका. नाही तर आमचं काही खरं नाही. पण मी सोडणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंनी विरोधकांवर तोफ डागली.

भुसावळ शहरात गडकरी नगरात छत्रपती संभाजी राजे चौकात शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार संतोष चौधरी, रोहिणी ताई खेवलकर खडसे, माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी,, मर्जीया पठाण , शेख शफी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे व नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन चौधरी, जयेश चौधरी, वरणगाव चे उमेदवार राजेंद्र चौधरी सह उमेदवार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन उत्तम सुरवाडे यांनी केले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी ‘भुसावळ शहराचा विकास करण्यासाठी कोणताही राजकीय वारसा नसलेल्या या लेकीला संधी द्या. एक नवा इतिहास घडवून दाखवू. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून येते’ अशी भावना व्यक्त केली. नेत्यांनीही ‘आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. घराणेशाही चालवणारे नाही. लोकांनी, लोकांसाठी, लोकांना सेवासुविधा पुरवण्यासाठी त्यांना उभे केले आहे.’ असे नमूद करून खंबीर पाठबळ दिले.
खडसेंची चौफेर फटकेबाजी, म्हणाले जिल्ह्यात तर ‘लाडकी बायको’ योजना
- भुसावळात मोकाट कुत्र्यांचा हैदोस असल्याच्या बातम्या रोज वर्तमानपत्रांत येताहेत. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर ‘त्या मोकाट जनावरांना कोंडवाड्यात घालण्याची ही वेळ आहे. ती मोकाट जनावरे कोणती हे सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.
- भुसावळात पालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मंत्र्याच्या बायकोच्या प्रचारासाठी साक्षात मुख्यमंत्री यांना यावे लागते एवढे आमचे मंत्री महोदय मोठे आहेत अशा शेलक्या शब्दांत खडसेंनी मंत्री सावकारेंना डिवचले.
- भुसावळला मंत्री संजय सावकारे, जामनेरात मंत्री गिरीश महाजनांनी, चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या बायकांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. भाजपची ही लाडकी बायको योजना नाही तर दुसरं काय? मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुलीला उमेदवारी दिली आहे. ही घराणेशाही नाही तर दुसरे काय आहे?
- राजकारणात असलेली ही अनेक उंदीर, मांजरे, एकत्र येऊन माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करायचे. आता बोलती का बंद झाली. भाजपची मंडळी धमकी देताय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सत्ता पालिकेत आली तर निधी मिळणार नाही. ऐवढी यांना सत्तेची मस्ती आहे. पण राज्याचा निधी यांना यांची खासगी प्राॅपर्टी वाटते आहे का? ही मुजोरी, मस्तवालपणा जिरवायचा आहे.


