भुसावळ (उज्वला बागुल ) : ‘वरणावच्या शामल झांबरे, सुनील काळे यांना राजकारणात मी मोठं केलं. मात्र जेव्हा माझ्यावर अन्याय झाला तेव्हा भाजपशी काडीमोड घेतला. तेव्हा या दोघांनी माझ्या फोटोला चपला मारल्या. केवढा हा कृतघ्नपणा. लाजही वाटली नाही त्यांना. त्यांना वाटतं नाथाभाऊ संपला, पण नाही. शेर कधी थकत नाही. इथला समाज व माझ्यावर प्रेम घेणारे लोक मतपेटीतून बदला घेतील’ अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा वरणगावात खरपूस समाचार घेतला.

सत्ताधारींच्या दडपशाहीला घाबरू नका
वरणगाव पालिका निवडणूक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आयोजित केलेल्या कोपरा सभेत नाथाभाऊ बोलत होते. राष्ट्रवादीने इथे राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासह २१ उमेदवारांच्या प्रचारासाठी नाथाभाऊ मैदानात उतरले आहे. ‘आपले उमेदवार मालदार नसले पण दिलदार आहेत. विरोधक धनवान आहेत. ते सत्तेची, पैशांची मस्ती प्रलोभने मतदारांना दाखवतील. मात्र घाबरू नका. पैसे वाटप करताना कोणी दिसला की पकडा आणि शिंगाडाने बदडा.’ असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अन् सत्ताधाऱ्यांचा बाप काढला
‘राज्यातील सत्ताधारी काही नेते इथे येऊन गेले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नगराध्यक्ष निवडून दिला तर निधी देणार नाही असा दम भरल्याची माहिती मिळाली. मात्र, निधी त्यांच्या बापाचा आहे का?’ असा थेट प्रश्न करून खडसेंनी सत्ताधारी भाजप नेत्यांना खडसावले. मी अनेक दशके भाजपत असताना सभागृहात विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. सत्ताधारी पक्षांसमोर नुसता उभा राहिलो तरी निधी खेचून आणायचो. त्यामुळे निधीची चिंता करू नका. त्यांच्या छाताडावर बसून निधी वरणगाव पालिकेसाठी आणू. अशी ग्वाही मतदारांना दिली. त्यांचा भाषणाचा पूर्ण रोष हा भुसावळचे मंत्री संजय सावकारे व गिरीष महाजन यांच्यावर होता.
सुनील काळे भाजपची झेरॉक्स
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने आकांडतांडव करणारे सुनील काळे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. पण ते भाजपची झेरॉक्स आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांची मते खाण्यासाठी भाजप त्यांना रसद पुरवत आहे. तसं राहिलं नसतं तर त्यांची कधीच भाजपने हकालपट्टी केली असती. पण ते तसे करणार नाही. कारण ही भाजपची झेरॉक्स आहे अशा शब्दांत नाथाभाऊ यांनी भाजपचे वस्त्रहरण केले.


