जळगाव (प्रतिनिधी ) :— “जगातील अनेक देशांनी आपल्या राज्यकारभारासाठी संविधानांची निर्मिती केली, परंतु त्या संविधानांत वेळोवेळी बदल झाले; मात्र भारतीय संविधानाने सुरुवातीपासूनच मानवतावादी मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. जळगाव जिल्हा बार असोसिएशनतर्फे संविधान गौरव दिनानिमित्त जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.

वाघ म्हणाले, “फ्रान्स, रशिया, जर्मनी, पाकिस्तान या देशांत पूर्वीची संविधानं बदलून नवी स्वीकारण्यात आली. अमेरिका व फ्रान्ससारख्या स्वातंत्र्यलढ्यांचे धडे देणाऱ्या देशांच्या संविधानातही सुरुवातीला महिलांना मतदानाचा हक्क, मुलभूत अधिकार यांचा अभाव होता. मात्र भारतीय संविधानाने जन्म, जात, धर्म, लिंग, भाषा यांवर आधारित कोणताही भेदभाव करता येणार नाही, हे प्रथमदिनापासून स्पष्ट केले. त्यामुळे भारतीय संविधान जगाला मार्गदर्शक ठरते.”
ते पुढे म्हणाले की, “अमेरिका व फ्रान्समध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे उदात्त विचार मांडले गेले, परंतु त्यांच्या संविधानसभेत स्त्रिया, गुलाम किंवा आदिवासी यांचे प्रतिनिधित्व नव्हते. त्याउलट भारताच्या संविधानसभेत सर्व समाजघटकांचा सहभाग होता—महिला, अस्पृश्य, आदिवासी, अल्पसंख्य सर्वांचे प्रतिनिधित्व होते. म्हणूनच भारतीय संविधान हे केवळ शासनाच्या कार्यपद्धतीचे मार्गदर्शन करणारे नाही तर प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता व समान हक्कांची हमी देणारे दस्तऐवज आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. सागर चित्रे यांनी केले. मंचावर ॲड. स्मिता झाल्टये, ॲड. वीरेंद्र पाटील, ॲड. प्रवीण चित्रे, ॲड. लीना म्हस्के उपस्थित होते.
कार्यक्रमाला ॲड. राजेश झाल्टये, ॲड. राजेश गवई, ॲड. आनंद कोचुरे, ॲड. अभिजित रंधे, ॲड. डी. एस. भालेराव आदींसह विविध वकील व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



