जळगाव ( प्रतिनिधी ) –
राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलन जळगावात २९ व ३० नाेव्हेंबर राेजी आयाेजित करण्यात आले आहे. रिंगराेडवरील यशाेदया हाॅल येथे हे संमेलन हाेईल. संमेलनस्थळाला ‘संविधान नगरी’ नाव देण्यात आले आहे. संमेलनात चार सत्र हाेतील. २५ ग्रंथ स्टाॅल लावले जाणार आहेत. तसेच गुरुवारी आढावा बैठकीत संविधान सन्मान पुरस्कारांची घाेेषणा करण्यात आली. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या कांताबाई रमेश अहिरे, शीलाताई पवार, नागपूरचे प्रा. डाॅ. श्रीराम साेनवणे, अमळनेरचे प्रा. अशाेक पवार यांचा समावेश आहे. संविधानाचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचा जागर करणाऱ्या सेवाव्रतींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ५००० रुपये राेख, शाल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी सांगितले की, संमेलनस्थळी आयोजित ग्रंथप्रदर्शनास भारताचे प्रथम राष्ट्रपती तथा संविधानसभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे नाव देण्यात आले अाहे. संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याला बेगम ऐजाज रसूल संसद पथ, मुख्य प्रवेशद्वारास टी. टी. कृष्णामाचारी, भोजनकक्षास सरोजिनी नायडू यांचे नाव तर विचारमंचास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात ‘आम्ही भारतीय लोक’ शिर्षकाची स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागूल, डॉ. सत्यजित साळवे, भारती रंधे, निलूताई इंगळे, प्रितीलाल पवार आदी उपस्थित हाेते.
असे आहेत पुरस्कारार्थी

कांताबाई अहिरे : छत्रपती संभाजीनगरात भांडी घासण्याचे काम करतात. त्या २०१८मध्ये संविधान जाळणाऱ्या लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या हाेत्या. ज्या घरात त्या काम करत होत्या त्या बाईनं तुमचे संविधान जाळलं गेलं असं म्हणणाऱ्या मालकिणबाईला निरुत्तर करीत काम सोडून दिले हाेते. त्यानंतर त्या जयपूरपर्यंत संविधानाचा जागरसाठी पोहोचल्या हाेत्या.

शिलाताई पवार : छत्रपती संभाजीनगर येथील असून ऊसतोड कामगार आहेत. त्यांनीही संविधान जागरच्या कार्याला वाहून घेतले आहे. भारतीय संविधान स्त्रियांना किती मानाचे स्थान आहे तसेच संविधानातील संविधानिक विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कांताबाईंबरोबर नेहमी अग्रेसर असतात. त्या संविधान रक्षणासाठी सतत अग्रेसर असतात.

प्रा. अशोक पवार : अमळनेर येथील असून महापुरुषांच्या विचारांचा तथा कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करतात. आतापर्यंत शेकडो बाल आणि युवावक्ते तयार होऊन त्यांनी हजारो व्याख्याने दिलेली आहेत. खेड्यापासून तर शहरापर्यंत भारतीय संविधानाचा घरोघरी प्रचार, प्रसाराचे काम करतारत. नवीन युवकांना जाेडतात.

प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे : विज्ञान, अभियांत्रिकी व नवसंशोधन या क्षेत्रांत दोन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. सध्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याला नवे क्षितिज देणारे ठरले आहे.


