जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा वाढता प्रश्न आणि कथित ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात तातडीने ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू संघटना, जळगाव यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

निवेदनात संघटनेने नमूद केले की, राज्यात महिलांची फसवणूक, धर्मांतरण, शोषण आणि गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे कुटुंबांना मानसिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
संघटनेने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत अशा प्रकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यांची अंमलबजावणी झाल्याचे उदाहरण देत, त्या राज्यांत महिलांचे संरक्षण अधिक प्रभावी झाल्याचा दावा केला. या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांना सुरक्षित, भयमुक्त वातावरण देण्यासाठी कठोर कायदा लागू करावा, अशी संघटनेची मागणी आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय हिंदू संघटना महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजयकुमार शर्मा, जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघ, उपाध्यक्ष नागराज महाजन, जिल्हा महिला अध्यक्ष मंगला बारी, महिला युवा अध्यक्ष रत्ना अत्तरदे, महिला उपाध्यक्ष भारती शिंपी, महामंत्री राजेश बंसल, महासचिव राजेंद्र बारी, जिल्हा युवा अध्यक्ष योगेश बाविस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


