जळगाव : सामाजिक सलोखा आणि जातीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या दिशेने जळगाव जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण २०४ लाभार्थी जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले.

या अनुदान वितरणाचा प्रातिनिधिक समारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी या जोडप्यांचे अभिनंदन करताना, “हे अनुदान केवळ आर्थिक मदत नाही, तर सामाजिक समता आणि जातीय सलोखा वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे प्रतिपादन केले.
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन समाजातील जातीय भेदभाव कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, अर्थसंकल्प २०२५-२६ मधील निधीतून ही मदत देण्यात आली आहे. अनुदानामुळे नवविवाहित जोडप्यांना संसाराची गाठी बांधताना आर्थिक आधार मिळणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच लाभार्थी जोडपी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


