रेल्वेच्या सतर्क तिकीट परीक्षकाने वातानुकूलित लोकलमधील बनावट तिकीट रॅकेटचा केला पर्दाफाश : पतीपत्नी विरुद्ध कारवाई :

मुंबई ता, २७ नोव्हेंबर २०२५ : मध्य रेल्वेच्या प्रवासी तिकीट निरीक्षक (पीटीआय) विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे वातानुकूलित लोकलमधील बनावट तिकीट वापरणाऱ्या प्रवासी तसेच बनावट तिकीट तयार करणाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दोघा पती पत्नी विरोधात करवाई करण्यात आली आहे .

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी कल्याण–दादर १०.०२ वाजताच्या वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान, विशाल नवले यांनी एका महिला प्रवासी – श्रीमती गुडिया शर्मा यांना थांबवले. त्यांनी अंबरनाथ–दादर प्रवासासाठी ११ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असल्याचा दावा करत यूटीएस जनरेटेड सीझन तिकीट (क्रमांक X06YDZG055) दाखवले.

तथापि, श्री नवले यांच्या तपशिलवार चौकशीमध्ये तिकीट संशयास्पद असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने त्याची पडताळणी केली असता तिकीट हे एका जुन्या कालबाह्य तिकीटावर आधारित बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर श्रीमती शर्मा यांना शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), कल्याण यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. पुढील चौकशीत हेही उघड झाले की हे बनावट सीझन तिकीट त्यांचे पती ओंकार शर्मा यांनी बनवून दिले होते.

या गैरप्रकारात सहभागी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) च्या कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मध्य रेल्वेने विशाल नवले यांच्या सतर्क कारवाईचे कौतुक केले असून त्यांच्या जागरूकतेमुळे बनावट तिकीट रॅकेट उघडकीस आल्याचे सांगितले आहे.

मध्य रेल्वेची प्रवाशांना सूचना
– प्रवासासाठी फक्त अधिकृत बुकिंग काऊंटर, एटीव्हीएम किंवा अधिकृत विक्रेत्यांकडूनच तिकीट घेण्याचे आवाहन.
– प्रवासी यूटीएस मोबाइल अॅप डाउनलोड करून तिकीट बुक करू शकतात.
– बनावट तिकीट तयार करणे, मिळवणे किंवा त्यावर प्रवास करणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून दोषी ठरल्यास दंड आणि कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.

या घटनेमुळे मध्य रेल्वेने बनावट तिकीटविरोधात कारवाई आणखी कडक करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.