“
भुसावळ (प्रतिनिधी ) – सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणानुसार भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे “रन फॉर युनिटी”चे आयोजन शुक्रवार,३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता शहरातील कृष्णचंद्र सभागृहा शेजारील मोकळ्या जागेतून सदरचा रन सुरु होईल. सुरुवातीस वॉर्म अप व्यायाम होईल व त्यांनतर धावायला सुरुवात होईल. धावण्याचा मार्ग कृष्णचंद्र सभागृहापासून सुरु होऊन डीआरएम कार्यालय – महात्मा गांधी पुतळा ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा असा राहील.

त्यांनतर सहभागी सर्व धावपटूंतर्फे सरदार वल्लभभाई पटेल पुतळा येथे थांबून माल्यार्पण करून वंदन केले जाईल व त्यानंतर त्याच मार्गे क्रीडांगणावर सर्व सहभागी परततील. या रन मध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सर्व धावपटू, सायकलपटू, जलतरणपटू सहभागी होणार आहेत. शिवाय या वर्षी शहरातील पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे या रन मध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


