केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्पष्टच सांगितले : भाजपाला कुबड्यांची गरज नाही ! –

मुंबई प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन केले. यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत महापालिका निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले तसेच भाजप आता कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, भाजप हा स्वबळावर चालणारा पक्ष असल्याचे ठणकावून सांगितल्याने त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातही दोन कुबड्या : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुबड्यावरुन केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यावर सत्तेत आहे. महाराष्ट्रातही दोन कुबड्या आहेत असा टोला राऊतांनी अमित शाहांना लगावला.

विरोधकांचा सुपडासाफ करा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुंबईत एकप्रकारे पालिका निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. आता डबल इंजिन सरकार नको तर ट्रिपल इंजिन सरकार हवंय, असं वक्तव्य अमित शाहांनी केलं. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहोळ्याला शाह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, दुर्बिण लावूनही विरोधक सापडता कामा नयेत, अशी घोषणाही शाहांनी केली.
अमित पुढे म्हणाले की, इमारत पाहून मी अभिनंदन करतो. 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्षांसोबत इथे मुख्यमंत्र्यांचे देखील कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे की, महाराष्ट्र भाजपने आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या आहेत. जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते की कमल खिलेगा. तेव्हा पहिले पंतप्रधान अटलजी झाले. त्यानंतर 11 वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेते झाले ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असे देखील त्यांनी म्हटले.