नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खूनांची मालिका सुरू असताना आताच एका हॉटेल व्यावसायीकाला धमकावत 10 टक्के ‘प्रोटेक्शन मनी’ वसूल करण्यासाठी दहशत निर्माण करण्याकरता शनिवारी मध्यरात्री 2.30 वाजता हॉटेल ऑरामध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेत एक ग्राहक गंभीर जखमी झाला आहे.

13 जणांविरोधात गुन्हा दाखल
हॉटेलमध्ये माजी नगरसेवकपूत्र भूषण लोंढे याच्या टोळीतील काही सदस्य वाद घालायचे. वाद मिटवण्यासाठी लोंढे हाच मध्यस्थीची 10 टक्के रक्कम घेत होता. याप्रकरणी भूषण लोंढेसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाने रात्रीच शुभम पाटील उर्फ भुरा, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, दुर्गेश वाघमारे या संशयितांना अटक केली.
सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या तक्रारीनुसार शनिवारी मध्यरात्री 2.30 वाजता नाइस संकुल येथील हॉटेल ऑरा बार अँड रेस्टॉरंट येथे काही तरुणांमध्ये भांडण सुरू होते. वाद मिटवण्यासाठी भूषण लोंढे व त्यांच्या टोळीचे शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिंस सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम,वेदांत चाळगे आणि पाच संशयीत हॉटेलमध्ये आले. प्रिंस सिंगने वरुण तिवारी (20) याच्यावर चाकूने हल्ला केला. शुभम पाटील उर्फ भुरा याने गावठी पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने गोळी वरुणच्या मांडीत घुसल्यासे त्यास गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. हॉटेल व्यावसायीक बिपीन पटेल, संजय शर्मा यांच्यावर दबाव टाकत 10 टक्केखंडणी वसूल करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
प्रथम वाद, नंतर प्रोटेक्शन मनी
भूषण लोंढे टोळी सातपूर, अंबड व त्र्यंबक रोडवरील रेस्टॉरंट अँड बारमध्ये टोळीतील काही जणांना वाद करण्यास सांगत. भूषण भाईची माणसे आहेत, अशी धमकी देत. व्यवसायावर परिणाम होत असल्याने हॉटेल व्यावसायीक भूषण लोंढेकडे मध्यस्थी करता गेल्यानंतर हॉटेलमध्ये काही वाद झाले तरी मी मिटवेल, माझे नाव ऐकले तर कोणी येणार नाही, असे सांगून प्रोटेक्शन मनी घ्यायचा. खंडणी वसुलीचा असा अजब फंडा लोंढे टोळीने सुरू केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.


