पिस्टलच्या धाकावर पेट्रोल पंपावर 22 हजारांची रोकड लूटली : शिरपूर तालुक्यात खळबळ –

शिरपूर – पिस्टलाचा धाक दाखवत 20 ते 25 वयोगटातील चार संशयीतांनी शिरपूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावरील 22 हजारांची रोकड लुटली. सुदैवाने कपाट न उघडल्याने 40 हजारांची रोकड बचावली. दरोड्याचा प्रकार मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवदजवळील सदाशीव पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला.
शिरपूर तालुक्यातील दहिवद जवळील सदाशिव पेट्रोल पंपावर मॅनेजर संतोष नगराळे, सेल्समन गणेश मोहिते, योगेश गवळे आणि सोमनाथ गवळी हजर असताना पहाटेच्या सुमारास चौकडी काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवर आले. त्यांनी चेहर्‍याला रुमाल बांधल्याने सेल्समनने पेट्रोल हवे आहे का? अशी विचारणा केली. त्याचवेळी त्यांनी बंदुका बाहेर काढून सेल्समनवर रोखत सोबत असलेली रोकड हिसकावली.

दरोडेखोरांनी यावेळी पंपावरील कार्यालय गाठत झोपेतील सहकार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून पैशाची मागणी केली मात्र तेथे त्यांना रोकड न मिळाल्याने त्यांनी पळ काढला. शिरपूर तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.