भुसावळ, (२७ जुलै प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदर्भासह मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस झाल्याने अचानक पाण्याची आवक वाढल्याने तापीवरील हतनूर धरणाचे ४६ पैकी १८ दरवाजे रविवारी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले. त्यां मुळे तापी नदीला पूर आला असून प्रशासनाने तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिना संपत असला तरी अद्याप ही समाधानकारक पाऊस पडला नाही. विशेषतः रावेर तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात अधूनमधून होत असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.
तिकडे पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने काही दिवसांपूर्वीही धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हतनूरचे १६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्या मुळे हतनूर धरणाच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने आता तब्बल १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत हतनूरचे ६ दरवाजे १ मीटरने उघडे होते. मात्र, त्यानंतर धरणातील पाणी पातळीत सततची मोठी वाढ होत असल्याचे रात्री २ बाजेच्या सुमारास आणखी पुन्हा ४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. परत पुन्हा आवक वाढत असल्याने थांबत रात्री ३ वाजेच्या सुमारास ४ दरवाजे उघडण्यात आले. आणि रविवारी पहाटे सकाळी ५ वाजता पुन्हा ४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. अशा प्रकारे विसर्ग वाढविण्यासाठी रात्रभरात हतनूरचे तब्बल १२ दरवाजे उघडण्यात आले. हतनूरच्या सध्या उघड्या असलेल्या दरवाजांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. ज्या माध्यमातून धरणाच्या सांडव्यातून सुमारे ३३ हजार ५४९ क्सूसेक आणि कालव्यातून १०० क्यूसेकने विसर्ग होत आहे. रविवारी सकाळी पाच वाजेपर्यंत हतनूरची पाणी पातळी २१०.४४ मीटरपर्यंत होती.
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पातळी कायम राखण्यासाठी वेळोवेळी विसर्ग वाढवावा लागत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हतनूर धरणातून होणारा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्या मुळे तापी नदीच्या दोन्ही काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत.


