जळगाव – जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

लम्पी स्किन आजाराच्या पाश्र्वभूमीवर गुरांचे बाजार पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक २२ जुलै रोजी काढले आहेत. त्या मुळे आता पुढील आदेश येई पर्यंत गुरांचे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या मुळे शेतकरी व गुरे व्यापाऱ्यांनी आपली गुरे विक्री साठी आणू नये असेही कळविले आहे.
आता पर्यंत जिल्ह्यात एकूण १६६ जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत, त्यापैकी ५० जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत ६६ जनावरे बाधित असून, ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर विशेष भर देत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जळगाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा आणि रावेर या सात तालुक्यांमधील २८ ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज (LSD) या विषाणूजन्य सांसर्गिक रोगाने बाधित जनावरे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि निरोगी पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत खालील आदेश जारी केले आहेत.
गुरांचे बाजार बंद : कासोदा (ता. एरंडोल), पारोळा, धरणगाव आणि रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
पशुधन वाहतुकीवर निर्बंध : आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि आंतरतालुका पशुधन वाहतूक पूर्णपणे बंद राहील. केवळ लंपी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या आणि २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांना प्रमाणपत्रासह वाहतुकीची परवानगी असेल. यासाठी जिल्हा पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना सीमेवर कसून तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक चराई आणि पाणवठ्यांवर बंदी : बाधित सात तालुक्यांमध्ये पुढील १५ दिवसांसाठी सार्वजनिक चराई आणि पाण्याचे हौद बंद राहतील.
किटकनाशक फवारणी : लंपी रोगाचा प्रसार डास, माशा, गोचिड यांसारख्या बाह्य किटकांमुळे होत असल्याने सर्व गोठ्यांमध्ये आणि परिसरात किटकनाशक आणि निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभाग यासाठी सहकार्य करेल.
मृत जनावरांची शास्त्रोक्त विल्हेवाट : मृत जनावरांसाठी ४ बाय ८ फुटांचे खड्डे खणून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था ग्रामपंचायतींनी करावी. गरज पडल्यास गट विकास अधिकारी, बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत ही व्यवस्था केली जाईल.
खाजगी पशुवैद्यकांना सूचना : सर्व खाजगी पशुवैद्यक आणि पशुपालकांनी लंपी रोगाची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थांना कळवणे बंधनकारक आहे. केवळ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करावेत. परंपरागत उपचार केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
औषधसाठा उपलब्धता : जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लंपी रोगाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करावा.
लंपी स्किन डिसीज हा विषाणूजन्य रोग असून, त्याचा प्रसार किटकांद्वारे होतो. यामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पशुपालकांना या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


