लोको पायलटवर टीटीईचा साखळीने हल्ला, रेल्वे कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त –


भुसावळ (सा वा ) –
बल्हारशाह रेल्वे स्टेशनवर नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र-12656) मधील टीटीई इंद्रराज मीना यांनी लोको पायलट घनश्यामदास बैरामी यांच्यावर साखळीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात लोको पायलट जखमी झाले असून, या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तक्रारदार घनश्यामदास बैरामी (वय 31), सहाय्यक लोको पायलट यांनी रेल्वे पोलिस ठाणे, बल्हारशाह येथे दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 22 मार्च 2025 रोजी रात्री 11:40 वाजता घडली. लोको लॉबी,बल्हारशाह ते जाडवारा ड्युटीसाठी प्रवास करताना, त्यांनी 3AC कोचमधील टीटीई इंद्रराज मीना यांच्याकडे बडनेरा स्टेशनपर्यंत सीटची विनंती केली.

मात्र, टीटीईने जागा देण्यास नकार दिला आणि प्राधान्य पास असूनही ती उपलब्ध करून देता येणार नाही, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि टीटीईने शिवीगाळ करत लोको पायलटवर साखळीने हल्ला केला. या मारहाणीत घनश्यामदास बैरामी यांच्या डाव्या हाताला, मनगटाला, डोक्याला आणि काखेला गंभीर दुखापत झाली.
रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा!
या घटनेची माहिती नागपूर क्रू कंट्रोल, बल्हारशाह लॉबी क्रू कंट्रोलर, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. जखमी अवस्थेत असतानाही लोको पायलटने 23 मार्च 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला असून, आरोपी टीटीईवर त्वरित कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सीसीटीव्ही फुटेज गायब?
बल्हारशाह रेल्वे स्टेशनवर 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या घटनेचे फुटेज उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, हे विशेष आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलीस कारवाईची मागणी..
टीटीई इंद्रराज मीना यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी लोको पायलट आणि रेल्वे कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.रेल्वे प्रशासन आणि पोलिस आता या प्रकरणावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीटीई संघटनेचा उलट दावा; लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकास मारहाण..
चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकाच मारहाण केल्याचा प्रकार घडला असल्याचा उलट दावा करत टीटीई संघटनेकडून या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 24 मार्च रोजी भुसावळ रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक संघटनेच्या वतीने काळ्याफिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान मारहाण करणाऱ्या लोको पायलट विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.